आकांत
Author: सुबोध जावडेकर
Marathi translation:
Hindi translation:
Available in:
Pages: १००
Price: $१.१४
Book Review: विद्या गणोरकर (मोमीन )
Book Review
कुठल्याही दुर्घटनेचे दुःख कालातीत असते. कधीही त्याबद्दल ऐकले, वाचले, आठवले, किंवा बघितले तरी मन सुन्न होते, गलबलून येते, पोटात ढवळून येते. मग तो वैयक्तिक प्रसंग असो कि सामुहीक, सामाजिक ! त्याला काळ, वेळ, वर्ण, धर्म, जग ह्या कशाच्याही मर्यादा नसतात. तुम्ही त्याचे बळी असलात, साक्षीदार असाल तर अधिकच प्रकर्षाने सारे उफाळून येते. ते का झाले, टळू शकले असते का ही अनुत्तरीत प्रश्ने पुन्हा पुन्हा भेडसावतात.आकांत पुस्तक वाचतांना ह्या दाहक अनुभवातुन वाचक पिळून जातो हे पुस्तकाचे यश आहे.
भोपाळमध्ये युनिअन कार्बाइडच्या प्लॅन्टमध्ये झालेल्या दुर्घटनेवर आधारित ही कादंबरी आहे. प्रस्तावनेत सांगितल्या प्रमाणे सुभोध जावडेकर घटना घडल्यावरची मीमांसा करत नाही. त्याबद्दलचे वर्णन ते थोडक्या प्रभावी शब्दात सांगतात. पण तो दुर्दवी प्रसंग कसा हळूहळू शिजत गेला त्यामागची सविस्तर कारणे वाचतांना मती गुंग होते. मानवी क्षुद्र हेवेदावे, चढाओढ, हलगर्जीपणा हे सगळीकडे असतात. कादंबरीतील सारी पात्रे आपल्याला कुठे ना कुठे भेटलेली असतात त्यामुळे कहाणी सुरवातीपासूनच मनाची पकड घेते.
साताऱ्यामधील एका मोठ्या प्लॅन्टच्या कर्मचाऱ्यांची ही कथा आहे. पण भारतातल्या कुठल्याही गिरणी, कारखाना, कुठलेही क्षेत्र, किंवा गव्हरमेंट कॉलनीची ही कथा होऊ शकते. विविध प्रदेशातून आलेले हे पुरुष एकाच उद्देशाने आले आहेत. प्लॅन्टमध्ये काम, उत्पादन, आणि त्याची सुरक्षतिता. पण मग अंतर्गत राजकारण, मत्सर आणि पुढे जाण्याची चढाओढ ह्यात मुख्य हेतू मागे पडतो. वेगळ्या वेगळ्या विभागात काम करत असलेल्या लोकांच्या वैयक्तिक समस्या, त्यांचे एकमेकातले हेवेदावे, मत्सर, आणि कामातला उद्वेग जावडेकरांनी अतिशय सुंदर शब्दात आकाराला आहे ते वर्णन वाचताना त्या वक्ती व वातावरण, त्यांचे दैनंदिन आयुष्य नजरेसमोर येते. नोकरशाही, राजकारण, लाचलुचपत, चढाओढ ह्या सर्व गोष्टी स्वतंत्र असल्या तरी जेव्हा त्या एकत्र येतात तेव्हा काय दारुण परिणाम होऊ शकतात ह्या सामान्य नियमाची गुंफण लेखकांनी सहजपणे मांडली. कामातला हलगर्जीपणा, नीतिमत्तेची कमतरता आणि कामाबद्दलची बेफिकिरीता वाचतांना उद्विग्नता वाटते. उत्पादन, नफा हे प्रत्येक कंपनीचे ध्येय, लक्ष्य असते. वरिष्ठ अधिकारी त्यासाठी काहीही करायला तयार असतात हे तर सगळीकडेच पाहायला मिळते. पण जेव्हा सुरक्षतेतीची तडजोड, काटकसर आणि दुर्लक्ष होते तेव्हा त्याचा शोकांकितेत अंत होतो ह्यात शंकाच नाही. इथेही तेच घडले.
वेगळी खाती सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना इतर खात्यांमध्ये काय चालले आहे ह्याची कल्पना नसल्यामुळे सर्वच ठिकाणातील सुरक्षेचे उपाय गुंडाळून ठेवले जातात आणि शेवटी जो हाःहाकार आणि आकांत होतो तो अपरिहार्य आहे. हळूहळू शिजत गेलेल्या घटनांचा कळस सुभोध जावडेकरांनी अतिशय तपशीलवारपणे व परिणामकारी शब्दात मांडला आहे.
दुरुस्त न होणाऱ्या चुका झाल्या आहेत हे लक्षात आल्यावर प्लॅन्टमध्ये उडालेली घबराट वाचकालाही थरारून सोडते. धोक्याची सूचना लक्षात आल्याबरोबर जबाबदार, वरिष्ठ अधिकारी तातडीने पळ काढतात आणि होतकरू, कामाची चाड असलेले, विवेकबुद्धी असलेले खालच्या पदावरचे कर्मचारी प्लॅण्टच्या बचावासाठी धाव घेतात ह्या विरोधाभासाने कादंबरीचा शेवट करून जावडेकर वाचकाला सुन्न करून जातात. त्यांनी न लिहिलेले नंतरचे भयानक दृश्य डोळ्यासमोर येते. तुंम्ही त्या दुर्घटनेचा एक भाग होऊन अस्वस्थ होता हे ह्या कादंबरीचे यश आहे.प्रस्तावनेत सांगितल्याप्रमाणे आता सुरक्षतेतेचे नियम कडक झाले आहेत. पण मानवी स्वभाव बदलला आहे का? हे असे पुन्हा घडणे अटळ आहे का? इतिहासापासून आपण काही धडा घेत नाही हे इतिहासानीच सिद्ध केले आहे. त्यामुळे दुर्दैवाने इतिहासाची पुनरावृत्ती कुठेतरी कधीतरी होईलच.