कवडसे स्त्रीजीवनाचे

Author: नीलिमा कुलकर्णी

Marathi translation:

Hindi translation:

Available in:

Pages: ३०४

Price:

Book Review: विद्या मोमीन

Book Review

जोपर्यंत स्त्रीचे अस्तित्व आहे तोपर्यंत तिची कथा, व्यथा आणि गाथा चालूच राहणार. कारण स्त्रीची मनोधारणाचं अशी आहे कि ती आजतागायत कुणालाही पूर्णपणे समजली नाही. अगदी स्त्रियांना सुद्धा!! तशीच काळानुसार, जगाबरोबर ती स्वतःला कशी साचेबद्ध करते हेही एक गूढ कुणी पूर्ण उलगडू शकले नाही. १०० वर्षांच्या कालावधीत अशा विविध स्त्रियांची ही मनोगाथा नीलिमा कुलकर्णींनी आपल्या कादंबरीत चित्रित केली आहे. स्वतःच्या कुटुंबाविषयी आणि थोडी काल्पनिक पात्रे घालून लिहिलेली ही आत्मकहाणी अगदी प्रामाणिक आहे लेखिकेच्या हृदयाच्या नजदिकच्या व्यक्तींचे हे जवळून पाहिलेले अनुभव, थोडे आत्मचरित्राचे मिश्रण असलेली ही कादंबरी वाचतांना त्यांची मानसिक घालमेल, जिव्हाळा आणि मनाला पडलेले पीळ वाचकापर्यंत पोचतात. १०० वर्ष्यांच्या काळात जग खूप बदलले. शिक्षण, समाजातील स्थान, व्यवसायांमधला पुढाकार हे स्त्रियांचे यश नक्कीच वाखाणण्यासारखे आहे. तरीही काही गोष्टी अजून बदललेल्या नाहीत. कादंबरीमध्ये भारतातील स्त्रियांबरोबर अमेरिकेतील संस्कृतीत वाढलेल्या आधुनिक पिढीचाही समावेश आहे. जगाचे, स्त्रियांच्या आयुष्याचे झपाट्याने झालेले परिवर्तन, जागतिक घडामोडींचे परिणाम हे कांदबरीतील पात्रांच्या माध्यमाने सहज रेखित झाले आहेत.

सध्याच्या काळातून कादंबरी फ्लॅशबॅकने सुरु होते. बहुतांशी विदर्भामध्ये घडलेली ही एका कुटुंबाची कहाणी १९२८ मध्ये सुरु होते. अर्थातच स्वातंत्र्यूपूर्व काळातील ही गोष्ट घरोघरी घडत होती. त्या पिढीचा संघर्ष, रूढींमुळे झालेले स्त्रियांचे हाल, गळचेपी, त्यातून बाहेर पडण्याची धडपड निर्व्याज गोदीच्या व्यक्तीमत्वापासून सुरु होते. गोदीबरोबर, गोदीला पाठोपाठ झालेल्या सात मुलींची, कहाणी अनेक स्थित्यंतरातुन जाते. सातही मुलींची आयुष्ये आपापल्या नशिबाने किती वेगळी घडली हे वाचताना वाचक स्वतःच्या अनुभवांना आठवतो. कधी नशिबाचे, कधी कर्तृत्वाचे फासे आपल्या आयुष्याला कायम भिरकावणी देत असतात.

सुशीला सर्वात देखणी आणि हुशार. साहजिकच तिला श्रीमंत, प्रतिष्टीत घराण्याची कुलवधू होण्याचे भाग्य लाभले. राजकीय आंदोलन, अस्थिरता ह्या काळात सुशीलेचा संसारही तिची परीक्षा पाहत होता. श्रीमंती कशी देखाव्याची असते आणि सुसंस्कृतपणा कसा मानवी स्वभावाशी विसंगत असतो ह्याची प्रचिती सुशीलेला तिसरी मुलगी झाल्यावर आली. मुलगा न देऊ शकणारी बायको समाजातल्या कुठल्याही घरात ठेचली जाते हे दारुण सत्य त्या काळाचे आणि अजुनहि काही ठिकाणी दिसून येते. वडिलांकडून आधार नाही आणि सासरकडून झालेली अवहेलना हे आघात सुशीलेनी कसे धीराने सामोरे केले हे नीलिमा कुलकर्णी ह्यांनी विशेष आत्मीयतेने चित्रित केले. प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या गुणांनी सुशीला मोतीलाल-हिराबेन कुटुंबाला जिंकून आपला संसार परत मिळवते. मानाने पुन्हा सासरी परतल्यावर तिची किंमत सर्वाना दाखवून देते हे त्या काळात लक्षणीय आहे. नाकारलेली तिसरी मुलगी, रजनी आता सर्वांची लाडकी होते.

त्या एकाच वेळी स्वातंत्र्य काळात आंदोलनात भाग घेऊन आपल्या जीवनाला वेगळं वळण देणारी उर्मी हे पात्र लेखिकेने रंगवले आहे. त्याच्या अनुसंगाने राजकीय परिस्थितीवर, आंदोलनांवर,बराच भर दिला आहे. त्या लढ्यातले ती एक प्रतीक आहे. अशी अनेक मुले, मुली आपल्या जीवनाला वाहून घेऊन अर्पित झाली आहेत. कवडसे स्त्रीजीवनाचे हा कादंबरीचा विषय विस्तीर्ण आहे. त्यामुळे अशी अनेक पात्रे, त्यांच्या आकांक्षांचा पुस्तकात समावेश आहे. लेखिकेचा जीवनातील अनुभव, कार्याच्या निमित्याने भेटलेल्या अनेक स्त्रियांचे बघितलेले आयुष्य सांगावेसे वाटणे हे साहजिक आहे. कधी कधी त्यामुळे विषयांतर झाल्यासारखे वाटून लेखनाचा ओघ विस्कळीत वाटतो. जेव्हा अनुभव विशाल असतो तेंव्हा तो मर्यादित न राहणे अपरिहार्य आहे.

मोठ्या कुटुंबात वाढलेल्या ह्या स्त्रियांची जीवनकथा वेगळ्या वेगळ्या अडचणींचा मागोवा घेते. सुभद्रामावशी एक अफलातून कॅरेक्टर आहे. सुशिक्षीत व सुसंकृत अशा साने कुटूंबात तिचा विवाह झालेला आहे. सासरच्या लोकांच्या प्रेरणेच तिने पदवी प्राप्त केली व प्रोफेसर झाली. तिला स्वःताचे मुल नाही यांचे दुःखही आहे. पण सुसंकृत कुटूंबाची साथ असल्यामुळे ती कितीतरी अनाथ मुलांची आई झालेली आहे, तर याउलट सुभद्रेला मात्र माहेरी मुल नाही म्हणून पदोपदी होणारा अपमान सहन करावा लागतो हा विरोधाभास नीलिमा कुलकर्णीनी चांगला मांडला आहे.

बनी हे पात्र लेखिकेच्या विशेष जिव्हाळ्याचे आहे. दारुडा, बायको मुलांना मारणारा, वयाने मोठा असलेला नवरा बनीच्या नशिबी येतो. ९व्या वर्षी लग्न, १३व्या वर्षी पहिले मूल आणि २५व्या वर्ष्यापर्यंत ९ मुले हे बनीचे दारुण आयुष्य. अती झाल्यावर एक दिवशी बनी नऊ मुले आणि नणंदेला घेऊन सुशीलेच्या दारी येते. सुशीलाने तिला सहारा दिला आणि मदत केली. बनीने माक्याच्या तेलाचा व्यवसाय सुरु केला आणि आपल्या हिमतीवर तो वाढवला. मुलांना कठीण परिस्थितीही शाळेत पाठवले. नवऱ्याला सोडून आलेली बाई म्हणून समाजाची बोलणी सहन करत तिने आपले व मुलांचे जीवन वळणाला लावले ही अतिशय अभिमानाची गोष्ट ठरली. तडफदार आणि कर्तबगार बनी कुठल्याही काळात चमकून राहील.

हुशार ज्योतीला सुशिक्षित सासर व नवरा मिळतो तरी तिच्या गुणांची आणि बुद्धिमतेची कदर होत नाही. ज्योती व सानव या जोडीविषयी वाचत असतांना अमिताभ व जया बच्चन यांचा अभिमान चित्रपट डोळ्यांसमोर येतो. चित्रपटाच्या शेवटी नायक आपला अहंकारी स्वभाव मान्य करतो पण येथे उच्चशिक्षीत व उच्चभ्रूंसमाजात वाढलेला सानव मनाने खूपच खुजा वाटतो. ज्योतीला उत्तेजन देण्याऐवजी तिचे पंखच काटतो. तिला खूप शिकण्याच्या उंच भरारी घेण्याच्या इंच्छांना, स्वतःचे मन मोडून, करियर बाजूला ठेवून परदेशी जावे लागते. हे द्वंद्व आजसुद्धा दिसून येते. ज्योतीचे वक्तिमत्व लेखिकेने खुबीने मांडले आहे.

रजनी उर्फ भाग्यश्री ही मूळची हुशार व मेहनती. पण तिच्या जन्मामुळे आपल्याला जो त्रास भोगावा लागला तो सुशीला कधी विसरली नाही. रजनीने कितीही पारितोषिके, बक्षिसे आणली तरी तिने कधी कौतुक केले नाही ह्याचे रजनीला खूप वाईट वाटते. इन्कम टॅक्सच्या आणि व्यवसायाच्या गाफीलतेमुळे तात्या, रजनीचे वडील अचानक हृदयाच्या झटक्याने मरण पावतात. एकुलता एक मुलगा दीपक, तोही लाडाने वाहवलेला, व्यवसाय सांभाळू शकत नाही. आपल्या वंशाचा कुलदिपक हवाच असलेल्या त्या दिपकाने घराचे तिनतेरा केले तरी त्याचे सगळे अपराध माफ होतात. तेव्हा रजनी धीराने घर व कुटुंब सांभाळते. बँकेत नोकरी करीत असतांना एका तरुण मुलाची भेट होते. अचानक लग्नाची मागणी आणि लग्न ठरून परदेशी जायची तयारी हे सारे ६ महिन्याचा आत घडते. विमानतळावरील निरोपसमारंभ व अमेरीकेतील स्वागत यांचे छान वर्णन केलेले आहे.वाचत असतांना आपल्यासमोर नकळत आपला पहिला विमानप्रवास आठवतो.

नवीन संसार, देश, संस्कृती, कोणीही परिचयाचे नाही अशा काळज्यांमध्ये रजनी पुढचे पाऊल टाकते. लवकरच मित्र मैत्रिणी मिळवून ती रमते आणि व्यापक मनोवृत्तीमुळे अमेरिकेतल्या आयुष्याशी जुळवून घेते. अमेरिकेतले अनुभव, नावीन्य, रूढी, सण त्याचबरोबर नवीन मातीत रुजण्याचा संघर्ष लेखिकेने माहितीपूर्वकपणे छान रंगवला आहे. अमेरीकेत आल्यावर स्वःताची ओळख निर्माण करण्याची व परदेश संस्कृतीशी जुळवून घेण्याची व आपली भारतीय संस्कृती टिकवून ठेवण्याच्या धडपडीची छान सांगड लेखिकेने केली आहे. अमेरिकेतही गेल्या ४० वर्षात आमूलाग्र बदल झालेला आहे. क्वचित दिसणारे भारतीय किराणा मालाचे दुकान आता गल्लोगल्ली १० झालीत. भारतापेक्षाही इथे सारे सुलभतेने मिळू लागले आहे. पण त्या काळाचे वर्णन, मैत्रिणी मिळवणे हे जुन्या इथे आलेल्या भारतीयांना आपले दिवस थोड्या फार फरकाने आठवून देतात. नव्या पिढीला कदाचित ते नावीन्य होईल.

रजनीचा संसार वाढला, मुले झाली, मोठी झाली. त्यांच्या जीवनात ती कर्तबगार, यशस्वी झाली ह्याने रजनी समाधानी होते. अमेरिकेच्या वास्तव्यात भेटलेल्या अनेक व्यक्तींची दुःख, काळज्या व समस्या रजनीने समजून घेतल्या सामाजिक कार्यामुळे तिने जवळून बघितलेले अनुभव वाचकालाही विचार करायला लावतात. नवीन व जुन्या पिढीतले आधुनिक काळातले संबंध, समस्या आणि मानसिक आंदोलने रजनीला भेटलेल्या स्त्रियांच्या माध्यमातून मांडले आहेत. आंतरराष्ट्रीय विवाह, सरोगेशन, मूल दत्तक घेणे अशा तत्कालीन गंभीर विषयांना नीलिमा कुलकर्णी ह्यांनी तोंड फोडले व सहजतेने ओळख करून दिली.

सर्व घटनांचा व कथानकाचा शेवट भारताची ट्रिप आणि कुटुंबासोबत घालवलेल्या वेळेमध्ये, गप्पांमध्ये होतो. कादंबरीचे कौटुंबिक वात्सल्य, जवळीक सुरवातीपासून ते शेवटपर्यंत टिकून राहते. कादंबरीच्या नावाप्रमाणे कधी प्रकाशामधून तर कधी अंधारामधून आलेले मनाचे, स्त्रीजीवनाचे कवडसे वाचकाच्या मनावरही छाया टाकतात.

Discussion Audio

CONTACT: vandana14046@gmail.com