Not Without My Daughter
Author: बेट्टी महमूदी,सहलेखक -विल्यम हॉफर
Marathi translation: लीना सोहोनी
Hindi translation:
Available in:
Pages:
Price:
Book Review: वृषाली तुळजापूरकर
Book Review
धर्म, जात, वंश, वर्ण, देश या सगळ्यापलीकडे जाऊन बेटीने प्रेम केलं, बेटीची कहाणी समजून घ्यायची असेल तर पुस्तक वाचावे.
मुळात हे पुस्तक म्हणजे फक्त बेटीचा लढा, मुलीची आणि तिची सुटका ह्यापुरतीच मर्यादित नाही. ह्यामध्ये अनेक न सांगितलेल्या कथा आहेत, बेटीचे खोल निरीक्षण आणि अफाट स्मरणशक्तीने लिहिलेली हि कथा आहे. बेटीने सुटका करून घेतल्यावरहि कथा संपते का, तर नाही. तिचा लढा सुरूच राहतो.
एक रुग्ण म्हणून हॉस्पिटलमध्ये गेल्यावर मेहमुदी(सगळे त्याला मुडी म्हणत असे) ह्या डॉक्टरशी तिची ओळख होते आणि ती त्याच्या प्रेमात पडते, ती त्याच्याशी विवाहही करते. हा बेटीचा दुसरा विवाह असून बेटी ह्या विवाहापासून अतिशय सुखी आहे, तिला एक मुलगी आहे जिचे नाव मेहमुदीच्या हट्टाने ठेवले माहतोब, माहतोब म्हणजे चंद्रप्रकाश. मेहमूदीने बेटी आणि माहतोब, बेटीचे आई-वडील सर्वावर अतिशय प्रेम केले, त्यांना आनंदी ठेवले, खुश केले.म्हणूनच जेव्हा मेहमूदीने इराणला त्याच्या कुटुंबाला भेटायला जाण्याचे ठरवले तेव्हा मनामध्ये शंका येऊनही; बेटी तयार झाली.
पुढची कथा म्हणजे मेहमूदीने त्यांचा पासपोर्ट काढून घेतला आणि तिला पुन्हा अमेरिकेला जाता येणार नाही, असे सांगितले. एका अनोळख्या सक्त इस्लामी कायदे असणाऱ्या देशांमधून एक अमेरिकन स्त्री आणि मुलगी अक्षरशः पळून आले, ते सुद्धा अनैतिक मार्गाने!
* बेटी हि अमेरिकन स्त्री आहे. तिला अमेरिकेमधील व्यक्तीस्वातंत्र्य माहिती आहे. कपडे घालण्यापासून बसण्याउठण्यापर्यंतचे जाचक कायदे, प्रार्थनेच्या वेळा-अवेळा, इस्लामी पुरुषसत्ताक पद्धती आणि स्वयंपाकघरापासून सर्वत्र दिसणारी गलिच्छता तिला सहन होणारी नव्हती. जेव्हा तिला समजते कि आता आपल्यालाच आपली सुटका करावी लागणार आहे तेव्हा बेटी काय करते? आपल्याजवळचे अमेरिकन डॉलर, दागिने, बँकेची पुस्तके अक्षरशः लपवून ठेवते कारण ह्याचाच तिला आधार असतो पळुन जायलाही आणि अमेरिकेला आल्यावरही. ती फारसी शिकते, जेव्हा आणि जिथे संधी आहे तेव्हा लोकांशी बोलते, लेकीच्या शाळेच्या निमित्याने बस, रिक्षा ह्यांची माहिती घेते, रस्ते लक्षात ठेवते. काही लोकांशी बोलून आपली कथा सांगून त्यांना आपल्या बाजूने वळवून घेते. मदत कधी आणि कशी लागेल ते माहिती नसतानाही ती थांबत नाही.
* बेटीने ह्या काळामध्ये काही अमेरिकन स्त्रियाही तेथे पाहिल्या ज्यांचे नवरे इराणी होते आणि त्या खुषीखुषीने सर्व नियम, इस्लामी कायदे पाळून संसार करीत होत्या. बेटीला अनेकदा ह्या स्त्रियांचे नवल वाटले कि त्या इथे कश्या जगत असतील? केवळ नवरा आहे, इतकेच त्यांना महत्वाचे आहे का? अमेरिकेला भेट देऊन त्यांना पुन्हा इथे येऊन राहायला काहीच वाटत नाही का? त्या इथून पळुन का जात नाहीत? ह्या मनात येणाऱ्या कुठल्याच प्रश्नाला बेटीला योग्य उत्तर मिळाले नाही. किंबहुना तू सुद्धा आता तुझा नवरा आहे तेथेच सुखी रहा, असा सल्ला मिळाला. काही काळापुरते बेटी तसेच जीवन जगते जेणे करून नवऱ्याला वाटावे कि ती बदलत आहे. त्यांचे सण साजरे करते, वेगवेगळ्या मस्जिदला भेटी देऊन प्रार्थना करते. हवे तर तू एकटी जा पण माहतोब इथेच राहील, ह्या त्याच्या विचारला खतपाणी देणारे मेहमूदीचे कुटुंब आणि राज्यव्यवस्था होती, कायदाही त्याच्याच बाजूने होता. तेव्हा अक्षरशः इस्लामी कायदे शिकून, कुराण वाचून आणि दिवसाच्या पाच पाच प्रार्थनेच्या वेळा सांभाळून तिने नवऱ्याला पुन्हा स्वतःच्या बाजूने वळविले. बाहेर जाताना वापरायचे इस्लामी कपडे, घरामधील बायकांचे नियम, कितीही आणि केव्हाही करावा लागणारा स्वयंपाक ह्यामध्ये ती तरबेज झाली आणि हळूहळू त्याचे मन निदान तिच्या शिक्षा कमी करण्यापुरते वळवले. हे करताना तिचे डोळे, कान सतत सतर्क होते. कोण आपल्या मदत करू शकेल, कोण नाही हे ती नेहमी चाचपडत असे. तिने तिच्या लहान मुलीलाही तसेच तयार केले होते. तिला तिच्या मुलीसह पुन्हा अमेरिकेला जायचे होते. ती अश्या देशात होती ज्या देशाचा अमेरिका हा सर्वात मोठा शत्रू आहे. तिचे अमेरिकन असणे, अमेरिकन दिसणे हेच तिच्यासाठी धोक्याचे होते. अनेकदा;अमेरिका मुर्दाबादच्या आरोळ्या ऐकताना बेटीचा जीव कसा पिळवटून निघत असे, ह्याचे दर्दभरे वर्णन बेटीने केले आहे. बेटीने तेथे इंग्लिशमधून कुराण शिकण्याचा क्लास लावला. तिथे तिला अमेरिकन स्त्रिया इराणी पत्नी म्हणून झालेल्या भेटल्या. पण त्या सगळ्याच तिच्या बाजूने उभ्या राहणाऱ्या नव्हत्या. ह्यामध्ये बेटीने जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपल्या आई-वडिलांशी देखील संवाद साधला फोनवरून. तिच्या आईने अमेरिकेमधून अनेक प्रयत्न केले. तेथे असलेल्या स्विस एम्बसीनेदेखील तिला काही प्रमाणात मदत केली. पण तिला तिथून कायद्याने मुलीसह पळुन जाणे अतिशय अवघड होते. एका प्रयत्नामध्ये तिला एक नंबर मिळाला आणि आशेची पालवी फुटली. अनेक धोके पत्करून तिला अनैतिक मार्गाने तुर्कस्थानामधील अमेरिकन एम्बसीमध्ये आणणे, हा मार्ग अखेरीस अवलंबला गेला.बेटी ह्या प्रवासाचे वर्णन करते, ते वाचणे म्हणजे अद्भुत अनुभव आहे. हवामान, माणसे, पोशाख, वाहन ह्यापैकी काहीही मदत करू शकत नव्हते. सतत चेहरा झाकायचा. गोरीपान अमेरिकन त्वचा आणि निळे डोळे कोणालाही दिसत कामा नये. भाषा माहिती नाही, कोण काय बोलत आहे, कुठे नेत आहेत समजत नाही. बेटी लिहिते माहतोब आणि मी ७ फेब्रुवारी १९८६ रोजी मिशिगनला घरी आलो. स्वातंत्र्याचा खरा अर्थ पारतंत्र्य उपभोगून आल्यावरच माणसाला नीट समजतो. १८ महिन्याच्या तुरुंगवास आणि मनस्तापानंतर बेटी आणि माहतोब पुन्हा अमेरिकेला आले. पण इथे आल्यावरही मेहमुदी कधीही येऊ शकेल आणि पुन्हा त्रास देऊ शकेल, मुलीला घेऊन जाईल हि भीती कायम आहे. बेटी लिहिते, मूडीच्या कचाट्यातून तशी आमची पूर्ण सुटका कधी होणार नाही हे वास्तव मी आणि माहतोबने स्वीकारलेलं आहे. कधीतरी तो स्वत: नाहीतर त्याच्या असंख्य भाच्या-पुतण्यांपैकी कोणीतरी कधीतरी आमच्यापुढे येऊन उभा ठाकेल, आमचा सूड घ्यायला येईल ही शक्यताही नाकारता येत नाही. कधीही माहतोबला इराणमधे पळवून न्यायचा बेत जर त्याने केला तर त्याचे सरकार त्याला पूर्ण पाठिंबा देईल हेही मी जाणून आहे. पण त्याचबरोबर माझ्या ताकदीची मूडीला कल्पना नसेल. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांत माझे अतिशय प्रभावशाली लोक माहितीचे आहेत व ते मूडीला असं कदापि करू देणार नाहीत. मी व माहतोब सध्या अमेरिकेत एका अज्ञात स्थळी नवीन नावे धारण करून राहात आहोत. अमेरिका स्टेट डिपार्टमेंटमधील टेरेसा हॉबगुड नामक केसवर्कने बेटीच्या आईला या काळात धीर देऊन शक्य ती मदत केली होती.
ज्या अमेरिकन स्त्रियांना व मुलांना त्यांच्या इच्छेविरुद्ध इराण व तत्सम मुस्लीम देशात डांबून ठेवले जाते त्या सर्व केसेस तिच्याच हाताखाली येतात. बेटीची कहाणी पुस्तकरूपाने प्रसिद्ध करून जगापुढे ठेवण्याची कल्पना तिने उचलून धरली.