पावनखिंड
Author: रणजीत देसाई
Marathi translation:
Hindi translation:
Available in:
Pages: १४४
Price:
Book Review: नीलिमा कुलकर्णी
Book Review
श्रीमान योगी आणि स्वामी सारख्या पुस्तकांचे खांदे लेखक रणजीत देसाई यांच्या समर्थ लेखणीतून उतरलेली आणखी एक कादंबरी म्हणजे पावनखिंड! तशीच भारदस्त भाषा, आणि इतिहास जिवंत करण्याची कला यात ही दिसते.
बाजीप्रभू देशपांडे हे शिवाजीला भेटण्याआधीचा इतिहास तसा वाचकांना नवीनच. मुगलांचे वतनदार कृष्णाजी बांदल यांचेकडे बाजी कामाला होते. शिवाजी महाराजांनी जासलोड गडावर हल्ला केला, बाजीप्रभू समोरासमोर आले, शिवाजीने बाजीची आणि शाजी महाराजांची जुनी ओळख लक्षात घेऊन त्यांच्यावर हल्ला केला नाही, त्यांचे मन वळवून आपलं करून घेतलं – बाजी, आणि त्याचा मोठा भाऊ फुलाजी विरघळला. या प्रसंगांचे अतिशय सुंदर शब्दचित्राने कादंबरीला सुरवात होते. शिवाजीची माणस जमविण्याची हातोटी, बाजीचे देशप्रेम, बाजीचे जुने मित्र तात्याबा यांची देशभक्ती सगळं शब्दातून जिवंत होतं.
गड जिंकल्यावर कृष्णाजी बांद्लांच्या मुलालाच ते वतन देऊन त्यालाही महाराजांनी आपल्यात घेतलं. शिवाजी महाराज, माणसांना आपलंसं करतच रहातात, कोणाच्या मुलीला मुलगी मानून, तर कोणाची मुलगी मुस्लिमांच्या छावणीतून सोडवून आणून. पण सोडवून आणलेल्या मुलीला तिचे वडील स्वीकारायचे नाकारतात, मुलगी आत्महत्या करते तो विदारक प्रसंग मनाचा ठाव घेतो. तत्कालीन समाजाच्या मानसिकतेच्या दर्शनाने मन उद्विग्न होते.
नंतरचा मुख्य प्रसंग म्हणजे देसाईंच्या सिद्धहस्त लेखणीचा साक्षात्कार. ‘श्रीमान योगी’ मधील शिवाजी महाराज पुन्हा एकदा डोळ्यापुढे येतात. राजांसारख्या दिसणाऱ्या शिवा न्हाव्याला घेऊन सिद्दी जोहरला हुलकावणी देणं, हाताशी धरलेला सपासप झाडे तोडणारा तोडपी अर्धवट झाडे तोडून राजांना निसटून जायला मदत करतो, सगळं घड्याळ्याच्या काट्यागणिक घडत जातं, अंदाज चुकला तर दुसरा बेत तयारच. बाजी प्रभू प्राणांची बाजी लावून गजाखिंडीत लढतात, आणि त्यांचे भाऊ फुलाजीही! फुलाजी, व बाजीमुळे गाठलेल्या लांब पल्ल्याबद्द्ल विचार करताना, मोहीम संपेल तेव्हा या दोघांना पालखीतून गडावर न्यायचे असं राजे मनाशीच ठरवतात. पण शेवटी, त्या दोघांची प्रेतं पालखीतून वर येतात – राजांच्या विकल मन:स्थितीची वाचक कल्पनाच करू शकत नाही, तिथकादंबरी संपते.
प्रत्येक पात्राचे व्यक्तिमत्व वर्णनामधून तर कधी प्रसंगातून साकार होतं. “संकट हे वरदान आहे. ती परीक्षा असते. जी मानसं त्याला सामोरी जातात त्यांचं यश वाढतं.” हे केवळ शिवाजीराजेच म्हणू शकतात. अमर झालेल्या बाजीच्या आणि फुलाजीच्या बलिदानाने गजाखिंड कायमची “पावनखिंड” झाली.
इतिहासावर आधारित कादंबरी लिहिण्यात रणजीत देसाईंचा हातखंडा आहे. त्या मालिकेतील हे पुस्तक एकदा तरी वाचावे असे आहे. ओघवती भाषा आणि भराभर सरकणारे प्रसंग यातून कादंबरी कधी संपली कळतच नाही. बाजी आणि फुलाजीच्या कुटूम्बियाबद्दल थोडं जास्त लिहायला हवं होतं असं वाटलं एव्हढंच !