फिरुनी नवी जन्मले मी
Author: अरुणिमा सिन्हा
Marathi translation: प्रभाकर (बापू) करंदीकर
Hindi translation:
Available in:
Pages: ११४
Price: $१.९४
Book Review: वसुधा खाडिलकर
Book Review
ही सत्यकथा अरुणिमा सिन्हा ह्या अतिशय जिद्दी, शूरवीर, आणि कमालीचा आत्मविश्वास असलेल्या एका गरीब कुटुंबातील मुलीवर आधारित आहे. तिच्या गोष्टीचा अनुवाद हा प्रभाकर करंदीकर ह्यांनी अतिशय सुंदर भाषेत केला आहे. तिने अक्षरशः तिच्या प्राणांची बाजी लावून तिचे अंतिम ध्येय साध्य केले. ११ एप्रिल २०११ ला पद्मावती एक्सप्रेस ह्या दिल्लीला जाणाऱ्या गाडीतून प्रवासासाठी निघालेल्या ह्या तरुण मुलीला आजिबात कल्पना पण नव्हती कि नियतीने तिच्या पुढे काय वाढून ठेवले होते. लहानपणा पासून पट्टीची खेळाडू, फुटबॉल, हॉकी, व कॉलेजमध्ये हॉलीबॉल चॅम्पियन, गावात अष्टपैलू म्हणून तिची ख्याती होती. वडीलांची सैन्यांत नोकरी त्यामुळे ते अतिशय करारी व धाडशी त्याचप्रमाणे आईने अनेक संकटांना तोंड देऊन खचून न जाता तिला व तिच्या भावाला लहानाचे मोठे केले. आपल्या आईवडिलांकडूनच तिने संकटांवर मात करून हिंमतीवर कसे जगायचे याचे धडे घेतले होते. हेड कॉन्स्टेबलच्या जागेसाठी तिची निवड झाली होती. मुलाखतीच्या पत्रातील चुकीची जन्मतारीख दुरुस्त करण्यासाठी ती दिल्लीच्या प्रवासाला निघाली होती. प्रवासात काही गुंड लोकांनी तिची सोन्याची साखळी ओढायचा प्रयत्न केला. अर्थातच, लहानपणापासून हार मानायची नाही ह्या स्वभावामुळे आणि मारामारीची सवय असल्यामुळे तिने त्यांना विरोध केला आणि त्यांच्याशी झालेल्या चकमकीत त्यांनी तिला चालत्या गाडीतून बाहेर फेकले. तिच्या दुर्देवाने विरूद्ध बाजूने येणाऱ्या गाडीखाली येऊन तिचा डावा पाय तुटला. उजव्या पायाची हाडे आणि स्नायू ह्यांचा पण चेंदामेंदा झाला. रात्रभर काळ्याकुट्ट अंधारात दोन ट्रॅक्सच्या मधे ती अर्धमेली पडली होती. शरीर अर्धमेले झाले होते पण मेंदू शाबूत असल्याकारणाने तशीच वेदना सहन करत ती तिथे पडून राहिली तिच्या अंगावरून उंदीर तिचे लचके तोडायला फिरू लागले. फक्त आकाशात चमकण्याऱ्या काही चांदण्यांचं तिला थोडे सुखावत होत्या.
भल्या पहाटे प्रातर्विधी करायला आलेल्या एका पिंटू कश्यप ह्या मुलाच्या ती दृष्टीस पडली आणि त्याने जवळच्या गावातील गावकऱ्यांना बोलावून आणले. तिला आशेचा किरण दिसला. कश्यपने तिच्या बहिणीच्या नवऱ्याला म्हणजे तिच्या मेव्हण्यांना लगेच फोन केला. वडील गेल्यापासून तेच तिच्या फॅमिलीचे आधारस्तंभ होते. त्यांनी लगेच तिला जवळच्या रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. तिला बरेलीच्या रुग्णालयात दाखल केले गेले. तेथे भूल देणाऱ्या डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे नाइलाजाने भूल न देताच शत्रक्रिया करून घेण्याचा कठोर निर्णय तिने मोठया धीराने घेतला. अनेक खेळांमध्ये साथ दिलेल्या तिच्या डाव्या पायाला तिला त्या दिवशी निरोप द्यावा लागला. त्याचप्रमाणे उजव्या पायावर शस्त्रक्रिया करून पोलादी नळ्या घालण्यात आल्या.
शस्त्रक्रिया झाल्यावर अवघ्या दोन वर्ष्यात एव्हरेस्ट चढून जाण्याचा अत्यंत अवघड निर्णय तिने घेतला आणि तिचे स्वप्न साकार करण्यासाठी तिला अनेक संस्थांनी, राजकीय नेत्यांनी त्याचप्रमाणे तिच्या हितचिंतकांनी अनेक प्रकारच्या देणग्या देऊन पाठिंबा दिला. लहानपणापासून अन्याय व संकटे यांना शरण न जाता खंबीर पणे त्याला मुकाबला द्यायचा हे तिच्या रक्तातच भिनले होते. तिचे मेहुणे 'साहेब', आणि पट्टीची गिर्यारोहक 'बचेंद्री पाल' ह्यांच्या मदतीने आणि प्रोत्साहनाने तिने २८ फेब्रुवारी २०१२ साली एव्हरेस्ट सर करण्याच्या प्रशिक्षणाला सुरवात केली.
एका अत्यंत पराक्रमी शेर्पा 'निमा कंचा ' ह्याची तिच्याबरोबर एव्हरेस्ट वर जाण्यासाठी निवड झाली. आता तिला मदत करणाऱ्या सर्व लोकांपासून दूर जाऊन अगदी एकटीने तिला तिचे ध्येय साध्य करायचे होते. वाटेत अनेक कठीण प्रसंगांना तिला सामना करायला लागला. अनेक वेळा रात्री अपरात्री, अरुंद बर्फाच्छादित चढावर, घसरड्या वाटांवर, अंग थिजून जाणाऱ्या थंडीशी झगडत, अनेकवेळा अन्नपाण्याविना, प्राणवायूच्या कमतरतेत, रक्ताळलेल्या खोट्या पायाच्या आधारावर ती तिच्या ध्येयाकडे चालत राहिली. तिच्या शेर्पाने अनेक कठीण प्रसंगी तिला परत माघारी फिरण्याचा सल्ला दिला परंतु 'जिंकींन किंवा मरीन' अशी जिद्द आणि निर्धार मनात ठेऊन कोणालाही न जुमानता अखेरीस तिने २६,००० फुटांवर २१ मे २०१३ साली भारताचा झेंडा फडकावला. विकलांग लोकांमध्ये एव्हरेस्ट वर चढणारी ती पहिली भारतीय महिला होती. ह्या प्रवासात तिला अनेक दैवी अनुभव आले ज्यामुळे तिचे प्राण वाचले. तिच्या असामान्य व्यक्तिमत्वामुळे भारत सरकारने तिला पद्मश्रीचा मान पण बहाल केला.
ही आत्मकथा वाचताना एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे, एवढ्या अवघड प्रसंगातून जाताना तिने कोणाही बद्दलचा राग किंवा चीड व्यक्त केलेली नाही. तिला पुनर्जन्म देण्यासाठी आणि तिचे ध्येय पूर्ण करण्यासाठी तिला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांची ती अत्यंत ऋणी आहे असे तिने अगदी मनापासून सांगितले आहे. संपूर्ण पुस्तकात तिचा समजूतदारपणा, सहनशीलता आणि सभ्यतेची वागणूक प्रकर्षाने जाणवते. सध्याचा तिचा नवीन उपक्रम म्हणजे तिने विकलांग लोकांसाठी एक क्रीडा संकुलन उभे केले आहे आणि ते यशस्वी करण्यासाठी तिचे प्रयत्न चालू आहेत. तिला तिच्या ह्या नवीन उपक्रमात भरभरून यश मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
नियतीने आपल्यासाठी काय डाव मांडून ठेवलेला असतो हे कुणालाच ठाऊक नसते. पण अनपेक्षित घडलेल्या दुर्घटनेमधून आयुष्याला संपूर्ण कलाटणी देण्याऱ्या अरुणिमा सिंन्हाची ही सत्यकथा वाचकाला एक आगळीच प्रेरणा देते हे नक्की.