शोध
Author: मुरलीधर खैरनार
Marathi translation:
Hindi translation:
Available in:
Pages: ४९७
Price: रु ५००
Book Review: वंदना जोशी
Book Review
'शोधं ' पुस्तकात ऐतिहासिक घटना रहस्यात रूपांतरीत करून मांडली आहे.
ऐतहासिक काळातली गोष्ट आहे शिवाजी महाराजांनी केलेली सुरतची लूट. ह्या लुटीतील काही भाग गायब होतो. सुरतेची लूट बरीच मोठी असते आणि ती सुरक्षितपणे रायगडावर न्यायची असते. शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून लुटीचे चार भाग करतात आणि त्यांच्या सैन्याचेपण चार भाग करतात. प्रत्येक तुकडीला सुरतेपासून वेगवेगळ्या मार्गानी जाऊन ती लूट रायगडा पर्यंत न्यायची जबाबदारी असते. प्रत्येक तुकडीला एक सेनाधिपथी असतो. नाशिक मार्गे जाणाऱ्या तुकडीचा सेनाधिपथी असतो गोंदोजी.
गोंदोजीला नाशिकमध्ये मुगलांशी सामना करावा लागतो. त्याचे बरेच सैन्य मारले जाते. आपला पराभव होणार हे लक्षात आल्यावर, गोंदोजी त्यानी आणलेली लूट नाशिकमधल्या डोंगरांमध्ये लपवून ठेवतो. खजिन्या पर्यंत कसे पोहोचायचे ह्याचा नकाशा काढून लपवून ठेवतो.
गोंदोजीला मुगल पकडतात आणि कोठडीमध्ये ठेवतात. त्याच्या खोलीमध्ये एक ब्रिटिश व्यक्तीपण जायबंद केलेली असते. गोंदोजीला मुगलांशी झालेल्या चकमकीत बऱ्याच जखमा झालेल्या असतात आणि त्याची तब्येत खालावत चाललेली असते. आपलं मरण आता अटळ आहे अशी जाणीव झाल्यावर गोंदोजी त्याच्या खोलीतील ब्रिटिशाकडे खजिन्याचा नकाशा कुठे मिळेल हे मोडी भाषेत लिहून देतो आणि त्याला विनंती करतो की तू सुट्लासकी हा कागद शिवाजी महाराजांकडे दे. ब्रिटिशाला घाईने ब्रिटनला परत जायला लागते त्यामुळे त्याला तो संदेश द्यायला जमत नाही आणि तो संदेश त्याच्या बरोबर ब्रिटनमधे जातो. अनेक वर्ष तो संदेश त्याच्या ट्रँकेमधे पडून असतो.
खजिन्याचा शोध कित्येक वर्षे सतत चालू असतो. आत्ताच्या काळात चार तुकड्या वेग वेगळ्या कारणा साठी खजिना शोधात असतात. पैसे कमावणं, ऐतिहासिक घटनेचा अभ्यास, घराण्याचं ट्रेजर वगैरे.
लुटीच्या काळातील सुरतेच वर्णन खूप सुरेख मांडलं आहे. सुरतेतील व्यापार, पूर्वीच्या काळातील सुरतेची श्रीमंती, वेगवेगळ्या देशातून व्यापारासाठी येणारे व्यापारी ह्याच वर्णन वाचताना लेखक आपल्याला सुरतेत घेऊन जातो. खजिन्याचा शोध घेताना नाशिकचं केलेलं वर्णन एकदम रोमहर्षक आहे. नाशिकच्या छोट्या गल्ल्या, नाशिकमधील डोंगर, दऱ्या , डोंगरात राहणारे लोक, त्यांचे सण ही माहिती वाचाकाला नाशिकला जायला प्रवृत्त करते, तिथल्या किल्ल्यांना भेट द्यायाला उद्दुक्त करत, तिथले डोंगर चढण्याचे आव्हान देते.
पुस्तकात सुरवातीला सगळ्या पात्रांची एकदम ओळख करून दिल्यामुळे गोंधळायला होत. काही गोष्टींचा संदर्भ लांबण लावल्यासारखे वाटतात पण जेव्हा नाशिकच्या डोंगरातील खजिना शोधायला सुरवात होते तेंव्हा गोष्ट पकड घेते आणि हि गोष्ट आहे की खरंच असं घडलय असं वाचकाला वाटून जाते.
ऐतिहासिक घटनेवर आधारित लिहिलेली ही रहस्यकथा वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते. खजिना सर्वात आधी आपल्या हाती लागावा ह्या उद्देशाने झपाटलेली विविध पात्रे मुजुमदारांनी अतिशय रसाळपणे मांडली आहेत. एकमेकांना छेद आणि शह देतांना निर्दोष लोकांचे बळी कसे पडू शकतात हे वाचतांना आयुष्यातील वास्तवता जाणवते. काही लांबलेली वर्णने मूळ कथानकापासून वाचकाला विचलित करतात परंतु ती माहिती काही वाचकांना अपरिचित असू शकते त्यामुळे मनोरंजक आहे.