तप्तपदी

Author: व.पु. काळे

Marathi translation:

Hindi translation:

Available in:

Pages: १६४

Price:

Book Review: नीलिमा कुलकर्णी

Book Review

तप्तपदी हा वपुंच्या ७ दीर्घ कथांचा संग्रह. सगळ्या कथांचं बीज पुस्तकाच्या नावामध्ये आहे. वरवधुची गाठ वराच्या उपरण्याशी बांधलेली असते, ते उपरणं तिला गाठीसकट सांभाळावं लागतं, झटकून टाकायचं म्हटलं तर त्याची जबर किंमत मोजावी लागते हा पुस्तकाचा गाभा. जसं पुस्तकाचं नाव आणि कव्हर सुसंगत तसेच प्रत्येक कथाबीज आणि कथा सुसंगत आहे.

माणसाच्या वागणुकीच्या, आचारविचारांचे धागे सहजपणे उलगडत मानवी मनाचेच विश्लेषण करणाऱ्या कथा – वपू याला ‘पॅटर्न’ म्हणतात. एकेका कथेतून एकेक ‘पॅटर्न’ पुढे येतो.

पहिली कथा ‘तू येत जा’ कॉलेजमध्ये असणारी सुंदर मुलगी एका गायकाच्या प्रेमात पडते, पण घरच्या परिस्थितीने एका ‘तथाकथित’ माठ मुलाशी लग्न करते. त्या माठाने निर्माण केलेले एक जाळे, तिच्या आणि गायकाच्या तरल भावना! संसाराच्या चौकटीतून आणि माठाच्या जाळ्यातून बाहेर नं येऊ शकणारी ती – त्यांच्या मानसिक विश्लेषणात ही अफलातून कथा आकार घेत जाते.

तिशी या दुसऱ्या कथेत वपु वेगळेच ‘पॅटर्न’ दाखवतात. नेव्हीत असणाऱ्या माणसाची बायको, तो आला की ताजी तवानी व्हायचा प्रयत्न करते. इतरवेळी घरची, मुलांची, आशूची काळजी घेत असते, त्याची कोणाला कदर नसल्याची खंत तिला सतत वाटते. या कथेत सहज – रोजच्या प्रसंगातून केलेले मनोविश्लेषण आहे. त्यातली दु:खाची व्याख्या विचार करायला लावणारी आहे. स्वत:ला होणारा मनस्ताप, स्वत: इतरांसाठी उपसलेले कष्ट, काहीतरी चांगलं व्हावं म्हणून केलेली धडपड, उपेक्षा... आणि इतरांना त्यामागच्या यातना समजण्याचा काळ- यातलं अंतर म्हणजे दु:ख. ‘masochistic’ tendency – म्हणजे स्वत:ला क्लेश करून घेण्यातला आनंद, किंवा ‘दु:ख उगाळणं’. कथा संपली की वाचक आत्मनिरीक्षण करायला थोडावेळ थबकतो. हे या कथेचं यश.

तिसरी कथा ‘आसावरी’ ही माझी सर्वात आवडती कथा. गायिका असणाऱ्या बायकोला गाऊ न देणारा अहंकारी नवरा समाजात सर्वत्र दिसतो. त्यात भर म्हणजे मुलाला गाण्याची आवड नाही, म्हणून गायक सासऱ्यांणी हि गाणारी सून मुद्दाम करून आणली असते. संसार की करीअर यात संसार निवडण्याऱ्या सुशिक्षित स्त्रिया सर्वत्र दिसतात. तो त्याग जेव्हा त्यांच्यावर लादला जातो तेव्हा त्याला वपु ‘हत्या’ म्हणतात. त्यांच्या गुणांची हत्या ही पण एक प्रकारची हत्याच ! कथेतलं शेवटचं वाक्य काळजाला भिडतं, ‘ हत्या अनेक प्रकारची असते, सगळेच मारेकरी सापडत नाहीत, आणि जे सापडतात त्यांना शिक्षा होउ शकत नाही.’

त्यानंतरची ‘प्रतिक’ ही कथा अतिशय वेगळी आहे. भावनावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक स्वामी या बाईला अनेक वर्ष सतत एक दगड जवळ ठेवायला सांगतात. यातला ‘दगड’ हा प्रतीकात्मक असला तरी त्यापेक्षा संयम, विश्वास, श्रद्धा, निर्धार आणि त्यातून मिळणारी शक्ती, त्याची प्रतीके कथेतील पात्रांच्या रुपाने आहेत ती जास्ती प्रभावी आहेत. कथेतील दोन प्रभावी वाक्य ‘ श्रद्धा ही एक अत्यंत वैयक्तिक बाब आहे. ती सार्वजिनक झाली की पंथ निर्माण होतात.’ दुसरं वाक्य: ‘ठिणगी ठिणगीच असते, ती कुठे पडते यावर तिचं अस्तित्व टिकतं.’

‘pattern’ याच नावाने असणारी कथा, चौकटीच्या आत आयुष्य न पेलणारी माणसे, अटेन्शनसाठी ना ना प्रकारच्या क्लुप्त्या योजत असतात, अशा व्यक्तीची कथा आहे. कथेची नायिका एक तरूण मुलगी. तिच्या विचित्र वागण्यामुळे गोंधळलेला तिचा नवरा, तिच्या वडिलांकडे जातो. वडिलांना तिच्या लहानपणापासून विचित्र वागण्याची आठवण होते, आणि ते तिचा Pattern समजून घेऊन तिच्याशी वागत होते ते आठवतं. वडील विचार करतात, “मुलीचं असं वागणं आपण pattern म्हणून स्वीकारतो, बायकोचं स्वीकारता येईल का?’ खूप विचार करायला लावणारं वाक्य आहे. इथे तप्तपदी नवऱ्याच्या वाट्याला आली आहे.

Marriage is a deal, ही पैसाप्रेमी सासूला धडा शिकवणाऱ्या सुनेची कथा. पण असं क्वचित घडतं असं मला वाटतं. मूळ स्वभाव बदलणं अशक्य असतं. विशेषत: जी आत्मकेंद्री आणि डॉमीनेटिंग माणसं असतात त्यांचा सुंभ जळला तरी पीळ कायम रहातो. म्हणून कथेचा शेवट मला पटला नाही.

शेवटची ‘दिशा’ ही कथा वेगळ्याच दिशेने जाते, इथे तप्तपदी म्हणजे नवरा बायकोत, नवरा तडजोड करतो, तो गाठीचा भार पेलतो. सुंदर आई आणि स्वत:ची मुलगीही सुंदर असलेल्या बाईच्या न्युनगंडावर बोट ठेवले आहे. वेगवेगळ्या कथांमधून उलगडलेले मानवी मनाचे धागे, त्यांची गुंतागुंत खूप सुंदर प्रकारे यात उतरली आहे.नामवंत लेखकाच्या दर्जेदार पुस्तकात या पुस्तकाचा समावेश करावा लागेल. वपुंच्या साहित्य शैलीचा एक उत्तम नमुना म्हणून हे पुस्तक जरूर वाचावे.

Discussion Audio

CONTACT: vandana14046@gmail.com