वेगळी माती वेगळा वास
Author: अरुणा ढेरे
Marathi translation:
Hindi translation:
Available in:
Pages:
Price:
Book Review: विद्या गणोरकर (मोमीन )
Book Review
प्रवास हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय! मग ते लहानपणी आजोळी जाणे असो किंवा म्हातारपणी नातवंडांकडे दूर देशी जाणे असो, सारेच त्याची आतुरतेने वाट बघत व बेत आखत असतात. एकट्याने, सोबतीने, किंवा ग्रुप बरोबर केलेला कुठलाही प्रवास आपल्या आयुष्यात काही ना काही भर टाकतो. प्रवास करून आल्यावर आपले अनुभव इतरांना सांगणे हे तर प्रवासापेक्षाही आनंददायक असते. लक्षावधी प्रवासवर्णने, फेसबुक, ब्लॉग हा त्याचा पुरावा आहे. श्रोते, वाचकही त्यात तेव्हढ्याच ऊत्सहाने सामील होतात. कधी मोहरून हे बघायलाच पाहिजे तर कधी नाही रे बाबा आपण हे करू शकणार असे मनोमनी म्हणत असतात.
अरुणा ढेरेंचे वेगळी माती वेगळा वास हे पुस्तक वाचतांना हा प्रत्यय क्षणोक्षणी येतो. अनेकदा प्रसिद्ध, नावाजलेली, प्रवाश्याना सुलभ अशी ठिकाणे बघितली जातात. आणि आपल्या परसदारी असलेली बहुमूल्य वास्तू मात्र दुर्लक्षित होतात. अशाचपैकी अनेक अप्रतिम पण न ओळखल्या गेलेल्या ठिकाणांचे वर्णन अरुणा ढेरेंनी अतिशय मोहक अनुभवातून शब्दांकित केले आहे.
ह्या प्रवास ठिकाणांचे वैशिष्ट्य हे कि त्या प्रत्येक जागेला इतिहास आहे. आणि लेखिकेने जाण्याआधी त्याचा अभ्यास केला आहे. चोखंदळपणे साऱ्या आख्यायिका, दंतकथा आवडीने ऐकून जेव्हा अरुणा ढेरे मंदिरात प्रेवेश करतात त्यावेळी त्यांचे एक भावनिक विश्व आधीच तयार झालेले असते. त्यामुळे ते नुसते मंदिर, शिल्प, गाव न उरता त्यांच्या तरल भावनांचा, आत्मीयतेचा आविष्कार वाचकाला जाणवतो. आपणही त्यात गुंतून व गुंगून ते चित्र डोळ्यासमोर आणतो . आपल्यालाही तेव्हढ्याच उत्कटतेने तिथे जावेसे वाटते हे ह्या पुस्तकाचे खरे यश आहे. इतिहास, लोककथा, कल्पना आणि प्रत्यक्ष ठिकाणचे अचूक वर्णन ह्या साऱ्यांची गुंफण एक वेगळाच दृष्टिकोन वाचकांसमोर ठेवते. पौराणिक, ऐतिहासिक आख्यायिका त्याच बरोबर मराठी, संस्कृत साहित्यातले त्याला पूरक संदर्भ स्वतःच्या भावनांमध्ये गुंफून लेखिकेने त्या स्थळाला जिवंत केले वाचकांसमोर. हा जो वैयिक्तिक सहभाग आहे तो फार कमी प्रवास वर्णनामध्येआढळून येतो. त्यामुळे प्रत्येक ठिकाण एक कथा होते आणि वाचकाला त्या काळाचा, प्रेमकथेचा अनुभव देते. प्रत्येक लेखामध्ये सखोल अभ्यास, मनापासून ते ठिकाण पाहण्याची आस आणि पूर्ण साभोवतालच्या आसमंताचा आढावा अगदी वेगळ्या विश्श्वात नेऊन सोडतो.
लेखनाचा सहज ओघ, भाषा, सखोल वाचनाने आलेली वैचारिक प्रगल्भता ह्या साऱ्यांची गुंफण प्रत्येक लेखामध्ये आहे. वाचक आपोआप त्याच वाटेवर गुंगून प्रवास करतो, ते चित्र डोळ्यासमोर आणू शकतो, ही ह्या पुस्तकाची खुबी लोभावनीय आहे. कुठल्या लेखाविषयी आणि काय लिहावे हे सांगण्याच्या आणि आकलनाच्या पलीकडे आहे कारण प्रत्येकच ठिकाण, त्याचा इतिहास, तिथल्या रहिवाश्यांचे वर्णन विस्मित करणारे आहे.
आग्रा हा लेख मनाला विशेष भिडला कारण बहुतांशी लोकांनी तो पाहिला आहे. पण जो दृष्टीकोन, आत्मीयता, यमुनेचे वर्णन अरुणा ढेरेंनी लिहिले ते मनाला सुन्न करून जाते. अरे आपल्याला तर हे जाणवलेही नाही ते बघताना, ह्याचा खेद वाटतो.
मी पुस्तकातली बहुतेक ठिकाणे पहिली नाहीत. पण हे पुस्तक बरोबर घेऊन आणि शक्य असल्यास अरुणा बाईंना घेऊन ती पाहावीत हे नक्की वाटते.